वन विभागातील ९३७ पदांना मुदतवाढ; वनीकरणाच्या कामांना मिळणार वेग!- Maharashtra Van Vibhag Bharti 2026
Maharashtra Van Vibhag Bharti 2026 Update
वन विभागातील ९३७ अस्थायी पदांना सहा महिन्यांची मुदतवाढ; वनीकरणाच्या कामांना मिळणार गती! रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली वनीकरणाची कामे सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी वन विभागातील ९३७ अस्थायी पदांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही मुदतवाढ १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळालेल्या पदांमध्ये ५४२ वनरक्षक, २३९ वनपाल, ९३ वन परिक्षेत्र अधिकारी, २५ सहाय्यक वनसंरक्षक, २५ लिपिक, १० लेखापाल, दोन विभागीय वन अधिकारी आणि एका कार्यालय अधीक्षक पदाचा समावेश आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरण, जलसंधारण, वनतळी आदी विविध कामे राबविण्यात येतात. ही कामे सातत्याने सुरू ठेवण्यासाठी संबंधित अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
या निर्णयामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या वनीकरणाच्या कामांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांमध्ये पुणे वनवृत्तातील सर्वाधिक २५५ पदांचा समावेश आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर १२९, नागपूर ९३ आणि नाशिक ६७ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अमरावती, ठाणे, कोल्हापूर, धुळे, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ वनविभागातील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.