Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » नोकरीची संधी! जिल्ह्यात ४१० होमगार्डची भरती लवकरच !! | Solapur Home Guard Bharti
Last Updated:

नोकरीची संधी! जिल्ह्यात ४१० होमगार्डची भरती लवकरच !! | Solapur Home Guard Bharti

Solapur Home Guard Bharti

पोलीस दलाला पूरक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या होमगार्ड दलातील रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४१० होमगार्डची भरती होणार असून, त्यामध्ये सुमारे १६० जागा महिला उमेदवारांसाठी असणार आहेत. त्यामुळे पुरुषांसह महिला उमेदवारांनाही होमगार्ड दलात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.या भरतीसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, २० ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण १,९०० होमगार्ड अपेक्षित असताना, सध्या ४९१ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरून दलातील मनुष्यबळ वाढविण्याच्या दृष्टीने भरती महत्त्वाची ठरणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून ते मोठ्या धार्मिक उत्सवांचे नियोजन आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेपर्यंत विविध जबाबदाऱ्यांमध्ये होमगार्डची भूमिका महत्त्वाची ठरते. पोलिसांच्या मदतीला धावून येणारे हे मनुष्यबळ गर्दीचे व्यवस्थापन आणि बंदोबस्तासाठीही तैनात केले जाते.

Advertisement

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच अन्य व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यांदरम्यान होमगार्ड पोलिसांना सहकार्य करतात. याशिवाय, निवडणुकांच्या काळात तसेच आषाढी आणि कार्तिकी वारीदरम्यान बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. सोलापूर शहरातील नवरात्रोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांतही होमगार्ड तैनात असतात. शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेकडूनही त्यांच्या मदतीचा उपयोग केला जातो.

होमगार्ड म्हणून सेवा बजावणाऱ्या जवानांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा निश्चित वेतन मिळत नसले, तरी बंदोबस्ताच्या ड्युटीच्या माध्यमातून त्यांना मानधन मिळते. सलग १० तास ड्युटी केल्यानंतर होमगार्डला १,२८३ रुपये मानधन दिले जाते. यामध्ये २०० रुपयांच्या उपहार भत्त्याचाही समावेश आहे.

वर्षभरात होमगार्डला साधारणतः ९५ ते ११० दिवस बंदोबस्ताची ड्युटी मिळते. त्यानुसार प्रत्येक होमगार्डला वर्षाला सुमारे सव्वा लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते. या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय ५० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी सध्या मळसिद्ध कोकरे सांभाळत आहेत.

Solapur Home Guard Bharti