Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » Primary Admission Criteria – आता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक; शासनाचा नवा नियम
Last Updated:

Primary Admission Criteria – आता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक; शासनाचा नवा नियम

Primary Admission Criteria

Primary Admission Criteria : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादेतील संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणापासून ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेत वयाबाबत एकसमान निकष लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिली या वर्गांसाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाची शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याने आगामी काळात शाळा प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येण्याची अपेक्षा आहे.

शाळा प्रवेशासाठी मुलांचे वय किती असावे, याबाबत पालकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने वर्गनिहाय वयोमर्यादा निश्चित केली आहे. नव्या नियमानुसार, नर्सरीमध्ये प्रवेशासाठी मुलाचे वय तीन वर्षे, ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे, सिनिअर केजीसाठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. विशेष म्हणजे, प्रवेशासाठी संबंधित शैक्षणिक वर्षाच्या ३० जूनपर्यंत पूर्ण झालेले वय ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाचे नियोजन करताना या वयोमर्यादेचा विचार करावा लागणार आहे.

Advertisement

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादेतील तफावत दूर करून संपूर्ण राज्यात एकसमान नियम लागू करण्याच्या उद्देशाने शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशींनुसार बालकांच्या पायाभूत शिक्षणाची रचना निश्चित करणे आणि विविध शिक्षण मंडळांमधील प्रवेशाच्या वयोमर्यादेत समानता आणणे, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे. यापूर्वी राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा विचारात घेतल्या जात होत्या. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. नव्या नियमांमुळे प्रवेश प्रक्रियेत एकसमानता येऊन पालकांचा गोंधळ दूर होण्यास मदत होणार आहे.

सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा

नव्या वयोमर्यादेच्या नियमांमुळे सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरीपासून इयत्ता पहिलीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांना नव्या वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात वयाच्या नव्या अटींमुळे अडथळा निर्माण होणार नाही.

दरम्यान, पूर्वप्राथमिक वर्ग आणि इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देताना शाळाप्रमुखांना किमान तसेच कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देण्याची मुभा असेल. यामुळे निर्धारित वयोमर्यादेच्या आसपास असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत लवचिकता मिळणार आहे. तसेच, मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात जाणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांनाही नव्या वयोमर्यादेच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ वयाची अट पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याच वर्गात थांबवले जाणार नाही.

Advertisement

Primary Admission Criteria