Maharashtra Police bharti 2022

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती!

गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यावेळी उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस सेवेत संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या गृह विभागात मागील दोन वर्षांत नवीन पदांची भरती झालेली नाही. २०१९ मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया तब्बल दीड वर्षे चालली. आता २०२० मध्ये घोषित झालेल्या पदभरतीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली. दुसरीकडे पोलिस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना पोलिस हवालदारपदी नियुक्ती करताना तेवढ्या जागा रिक्त नाहीत. त्यामुळे अजून अनेकजणांना त्याच पदावर काम करावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. पण, आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असा विश्‍वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी, पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *