जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीत तोंडी परीक्षेचे पारडे जड, निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!! – PDCC Hall Ticket Download
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदाच्या भरतीसाठी शासनाने नवी कार्यपद्धती जाहीर केली असून, लेखी परीक्षेस ७० तर तोंडी परीक्षेस ३० गुण निश्चित करण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर शासनाने भर दिला असला, तरी तोंडी परीक्षेला तुलनेने अधिक गुण दिल्याने अंतिम निवड प्रक्रियेत व्यक्तिनिष्ठतेला वाव मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, सहकार वर्तुळात या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाने यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेतून शिपाई पद वगळण्याचा तसेच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ६ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात शिपाई भरतीसाठी सविस्तर निकष निश्चित करण्यात आले आहेत.
जबाबदारी संचालकांवर
निर्णयानुसार शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे बंधनकारक करण्यात आले असून, ही परीक्षा अनुभवी व तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे आवश्यक राहणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची जबाबदारी संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर सोपविण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
तोंडी परीक्षेचे गुण ठरले चर्चेचा विषय
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थश्रेणी पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, संबंधित जिल्ह्यात पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरण्याची मुभा देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले असले, तरी तोंडी परीक्षेस देण्यात आलेले ३० गुण हेच आता चर्चेचा विषय ठरत आहेत. अंतिम गुणवत्ता यादीवर मुलाखतीचा मोठा प्रभाव पडू शकत असल्याने निवड प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत सहकार क्षेत्रात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखत कार्यक्रम दि. १२/०६/२०२६ ते दि. १४/०६/२०२६ या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब ची लेखी परीक्षा रविवार, दि. १४/०६/२०२६ रोजी पूर्वनियोजित आहे, याकारणास्तव रविवार, दि. १४/०६/२०२६ रोजी होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती सोमवार, दि. १५/०६/२०२६ रोजी पूर्व नमूद ठिकाणी व पूर्वनियोजित वेळेत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी संबंधित उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळावरील स्वतःच्या लॉगिन आय.डी. मधून सोमवार, दि. १५/०६/२०२६ रोजीचे सुधारित मुलाखत पत्र डाऊनलोड करून घ्यावे.
सुधारित मुलाखत कार्यक्रमानुसार शुक्रवार, दि. १२/०६/२०२६, शनिवार, दि. १३/०६/२०२६ व सोमवार, दि. १५/०६/२०२६ या कालावधीत मुलाखती होणार आहेत, मुलाखतीस पात्र उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी.