Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर,पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा! – Pavitra Portal Bharti Extension
Last Updated:

खुशखबर,पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा! – Pavitra Portal Bharti Extension

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमी मुले महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्याची मुदत आता १३ ऑगस्ट २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. पोर्टलवर एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, प्रक्रिया सुरू होताच पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे उमेदवारांनी सांगितले. पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही उमेदवारांच्या बाबतीत पोर्टलवरील माहिती व्यवस्थित दिसत नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे.

Pavitra Portal Bharti Date Extension

तसेच लाखो उमेदवारांचा पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ताण आल्यामुळे OTP मिळण्यास विलंब होत असल्याची समस्या अनेक उमेदवारांना जाणवत आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम नोंदविणे आणि तो लॉक करणे या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. शिक्षण विभागाने यापूर्वी उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्याची संधी दिली होती. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि मोठ्या प्रमाणातील उमेदवारांचा सहभाग लक्षात घेऊन आता ही मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षण संस्थांनी रिक्त जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदविल्यानंतर, प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी सहा ऑगस्टपासून मुदत देण्यात आली होती. परंतु, पहिल्याच दिवसापासून उमेदवारांना हे प्राधान्यक्रम भरण्यात अडचणी येत होत्या. लॉग इन न होणे, ओटीपी न मिळणे, ओटीपी मिळालाच तर संथ गतीने प्रक्रिया होणे, मध्येच ‘एरर’ दर्शविणे अशा अडचणींना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच प्राधान्यक्रम भरण्यासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी मिळाल्याने बहुतांश उमेदवारांना प्राधान्यक्रम भरताना नाकीनऊ आले होते. अखेर शिक्षण विभागाने त्यांची मागणी मान्य करीत, हे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी तेरा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ दिलेली असली तरीही, तांत्रिक समस्या मात्र अद्याप कायम असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Advertisement

सर्वाधिक समस्या ‘ओटीपी’बाबत असल्याने परीक्षा परिषदेने त्याबाबत ताताडीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे उमेदवारांनी सांगितले. मुदतवाढीबाबत जाहीर केलेल्या पत्रात परीक्षा परिषदेने उमेदवारांना काही सूचनाही केल्या आहेत. ‘ओटीपी’ साठी काही काळ प्रतीक्षा करावी, ‘ओटीपी’ न मिळाल्यास लगेच रीसेंडवर क्लिक करू नये, ज्या उमेदवारांना ‘ओटीपी’ मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी आपल्या ब्राऊजरची हिस्ट्री चेक करावी अशा सूचना परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आल्या आहेत. याबाबत परीक्षा परिषदेशी संपर्क साधला असता पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत मुलाखतीशिवाय ७६ हजार ३९४ व मुलाखतीसह ५६ हजार २०६ उमेदवारांनी प्राधान्यक्रम दाखल केल्याचे पवित्र पोर्टलमार्फत सांगण्यात आले.

मात्र, दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसून तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत किमान एक आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांसह विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात पत्रक जारी करून पोर्टलवरील अडचणींबाबत उमेदवारांना सूचना दिल्या आहेत. विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ७६ हजार ३९४ मुलाखतीशिवाय आणि ५६ हजार २०६ मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्या तरी उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उपलब्ध कालावधीत आपले प्राधान्यक्रम नोंदवून ते लॉक करावेत. OTP किंवा इतर तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यात बदल करण्याची संधी मिळणार आहे की नाही, याबाबत उमेदवारांनी पोर्टलवरील अधिकृत सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे वेळेत पूर्ण होण्यासाठी उमेदवारांनी आपली प्रक्रिया मुदतीपूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

Advertisement