नवीन पोलीस भरती कधीपासून? पोलीस विभागात २३ हजार पदे रिक्त! – Maharashtra Police Bharti 2026
Maharashtra Police Bharti 2026 – 2027 – पोलीस विभागात नोकरी मिळावी हे राज्यातील लाखो उमेदवारांचे स्वप्न आहे. १२ पास झाल्यावर अनेक उमेदवाराने पोलीस भरतीची तयारी सुरु करतात. ग्रामीण भागातील उमेदवारांमध्ये तर पोलीस भरतीचे मोठे आकर्षण दिसून येते. या वर्षी मार्च दरम्यान पोलीस भरतीची २०२५ प्रक्रिया पार पडली परंतु, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या मुळे पुन्हा पोलीस भरतीचे आयोजन लवकरच होणार असल्याचे चित्र आहे. हि भरती वर्षच्या शेवटी नोव्हेंबर मध्ये सुरु होणे अपेक्षित आहे. यासाठी उमेवारांमध्ये सुद्धा मोठ्ठा उत्साह दिसून येत आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्हीतील प्राप्त गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. पोलीस भरतीत यश मिळवण्यासाठी मैदानी सरावातील नियमितपणा, शारीरिक तंदुरुस्ती आणि लेखी परीक्षेचा अचूक अभ्यास या तिन्हींचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असते. योग्य नियोजन, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हजारो तरुण दरवर्षी खाकी वर्दी परिधान करण्याचे आपले स्वप्न साकार करतात.
RTI प्राप्त माहिती नुसार, ३० जून २०२६ पर्यंतच्या स्थितीनुसार, पोलीस दलातील २ लाख २५ हजार ४६१ मंजूर पदांपैकी २ लाख २ हजार १४१ पदे कार्यरत असून २३ हजार ३२० पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाई संवर्गातील आहेत. ‘असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय अॅक्टिव्हिस्ट्स’ (आसरा) संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती माहिती अधिकारातून मागवली होती. त्यावर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातील जन माहिती अधिकारी व कार्यालय अधीक्षक सतीश जाधव यांनी ती उपलब्ध करून दिली. त्यानुसार, पोलीस शिपाई संवर्गात मंजूर १ लाख २६ हजार ७०९ पदांपैकी १ लाख १० हजार १९३ पदे कार्यरत असून १६ हजार ५१६ पदे रिक्त आहेत. त्याखालोखाल पोलीस उपनिरीक्षक संवर्गात मंजूर ११ हजार ८८४ पदांपैकी ९ हजार ६ पदे कार्यरत असून २ हजार ८७८ पदे रिक्त आहेत.
सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गात मंजूर २० हजार ११९ पदांपैकी १८ हजार ५५७ पदे कार्यरत असून १ हजार ५६२ पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार पोलीस नाईक पदाचा हवालदार संवर्गात समावेश करण्यात आला. त्यामुळे हवालदार आणि पोलीस नाईक या दोन्ही संवर्गांतील ६१ हजार ७० मंजूर पदांच्या तुलनेत ६२ हजार ९५० म्हणजे मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक संवर्गातील ४५४ मंजूर पदांपैकी ४२४ पदे कार्यरत असून ३० पदे रिक्त आहेत. तसेच पोलीस उपअधीक्षक संवर्गातील ९७२ मंजूर पदांपैकी ७८७ पदे कार्यरत असून १८५ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या आणि विशाल भौगोलिक विस्तार लक्षात घेता राज्याचे पोलीस दल अपुरे पडत आहे. त्यामुळे राज्यातील २३ हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच प्रति एक लाख लोकसंख्येमागे २२२ पोलिसांच्या प्रमाणाच्या जवळपास मंजूर पदसंख्या वाढवण्यात यावी, यासाठी शासनाला निवेदन दिले आहे.