Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » मत्स्य व्यावसायिकांसाठी मोठी बातमी! २४ शासकीय योजना आता ऑनलाइन | Maha dbt matsya yojana registration
Last Updated:

मत्स्य व्यावसायिकांसाठी मोठी बातमी! २४ शासकीय योजना आता ऑनलाइन | Maha dbt matsya yojana registration

Maha dbt matsya yojana registration

मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्यातील मत्स्य व्यावसायिकांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मत्स्य व्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी देणे, या उद्देशाने योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मंत्री नीतेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लाभार्थीभिमुख योजनांची अंमलबजावणी आता अधिक गतिमान, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांना योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आता कार्यालयांचे हेलपाटे, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि फाईल्सचा त्रास कमी होणार आहे. राज्य शासनाने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत विभागाच्या २४ महत्त्वाच्या योजनांसाठी ‘शासनप्रक्रिया पुनर्रचना’ करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. त्यानुसार या सर्व योजनांची अंमलबजावणी आता १०० टक्के ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलद्वारे केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य व्यावसायिक आणि मत्स्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नव्या व्यवस्थेमुळे अर्जदारांना कागदपत्रे आणि भौतिक फाईल्स जमा करण्याची आवश्यकता राहणार नसून, संपूर्ण प्रक्रिया विनाकागद पद्धतीने पार पडणार आहे. विशेष म्हणजे, अर्जदारांची वैयक्तिक माहिती, बँक तपशील, जमिनीची माहिती आणि जात प्रमाणपत्रासंबंधीची माहिती इतर शासकीय प्रणालींवर उपलब्ध असल्यास ती अर्जात स्वयंचलितरीत्या भरली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, प्रक्रिया अधिक सुलभ बनेल आणि योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकताही वाढेल.

Advertisement

लाभ खऱ्या मत्स्य व्यावसायिकांपर्यंत

मत्स्य व्यवसायाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनांचा लाभ खऱ्या मत्स्य व्यावसायिकांपर्यंत पोहोचविणे, हे या सुधारणांमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे कोळंबी संवर्धन प्रकल्प, आधुनिक मत्स्यबाजाराची स्थापना, बिगरयांत्रिक नौकांचे यांत्रिकीकरण आणि शीतपेटी खरेदीसाठी अनुदान अशा विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच महिला मच्छीमारांसाठी हॅन्डग्लोज आणि गमबूट वितरणासारख्या योजनांचाही लाभ सुलभतेने मिळू शकणार आहे. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांना योजनांसाठी अर्ज करण्यापासून ते लाभ मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.