फक्त ८ हजारांत फुटला ‘TET’चा पेपर; भिवंडीत येईपर्यंत झाला दीड कोटीचा! – In 8 thousand TET Paper leak Maharashtra
महाराष्ट्र TET परीक्षा म्हणजे लाखो शिक्षकांचे स्वप्न असते. या मागे अनेक वर्षांची मेहनत दडलेली आहे. परंतु शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो उमेदवारांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या टीईटी पेपरफुटी रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे भिवंडी पोलिसांनी उलगडले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आग्रा येथी छापखान्यातील कर्मचारी नरेशकुमारने हा पेपर मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताचा साथीदार सोनू याला अवघ्या ८ हजार रुपयांत विकला. त्यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या राज्यनिहाय एजंट आणि दलालांच्या जाळ्याद्वारे तो पेपर प्रथम ८० हजार रुपयांना विकला. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर दलालांनी स्वतःचा नफा जोडत हा सौदा वाढवत नेला आणि भिवंडीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल दीड कोटी रुपयांपर्यंत पोहचली.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- TET 2026 ची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेनं प्रश्नपत्रिका छापण्याचे काम राज्याबाहेर, आग्रा येथील एका अत्यंत गुप्त छापखान्याला दिलं होतं. इतकं की, या छापखान्याचं नाव शिक्षणमंत्र्यांना, बड्या अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हतं. पण, सुरक्षेचा हा चक्रव्यूह भेदण्यासाठी आरोपींना कोणत्याही हायटेक तंत्रज्ञानाची गरज पडली नाही; तर केवळ एक ‘बूट’ आणि ‘८ हजार रुपये’ पुरेसे ठरले! ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखेने या आंतरराज्य पेपर लीक टोळीचा पर्दाफाश केला असून, या घोटाळ्याची धक्कादायक मोडस ऑपरेंडी आता समोर आली आहे. १५ ते १७ जून दरम्यान आग्र्याच्या ‘महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रेसमध्ये जेव्हा प्रश्नपत्रिकांची छपाई सुरू होती, तेव्हा तिथल्याच कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली. प्रेसच्या सुरक्षेसाठी माजी सैनिकांची फौज तैनात होती. आत येणाऱ्या-जाणाऱ्यांची कडक अंगझडती घेतली जात होती. पण, या सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांचे कपडे तपासले, मात्र बुटांकडे दुर्लक्ष केले. हीच चूक हेरून नरेशकुमार माहोरे ऊर्फ निक्की या कर्मचाऱ्याने प्रश्नपत्रिकेची घडी घातलेली पाने आपल्या बुटाच्या ‘इनसोल’ (तळव्याच्या गादीखाली) लपवली आणि तो सहज बाहेर पडला.
TET परीक्षेचे पेपर १ आणि पेपर २ चे प्रत्येकी दोन सेट छापले गेले होते, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणताही एक सेट अचानक निवडता येईल. मात्र, या कर्मचाऱ्याने सलग तीन दिवस हीच पद्धत वापरून प्रश्नपत्रिकांचे चारही सेट बाहेर काढले आणि परीक्षा परिषदेची रणनीती पुरती मोडीत काढली. या संपूर्ण कटासाठी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अवघे ८,००० रुपये आणि भविष्यात एक भूखंड (Plot) देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “सामान्य गुन्ह्यांमध्येही लाखो रुपयांची देवाणघेवाण होते. पण संपूर्ण राज्यातील ६ लाख शिक्षकांचे भविष्य ठरवणारा पेपर अवघ्या ८ हजार रुपयांसाठी विकला गेला, हे पाहून आम्हालाही धक्का बसला.” तर मित्रांनो असा आहे पूर्ण अपडेट आणि माहिती, तेव्हा सतर्क रहा आणि गुन्ह्याला थारा देऊ नका!!