गट ‘क’च्या नोकरीसाठी मोठा बदल; संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक!! – Goa PSC Recruitment 2026
Goa PSC Recruitment 2026
Goa PSC Recruitment 2026 : गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! राज्य सरकारने गट ‘क’ संवर्गातील शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला असून, आता संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे किमान ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात कार्मिक विभागाने नुकतेच नवीन नियम अधिसूचित केले आहेत. त्यानुसार, आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता पूर्ण करण्यासोबतच गट ‘क’ पदासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला संगणक प्रावीण्य चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. हा नवीन नियम गट ‘क’ संवर्गातील तब्बल १८८ विविध पदांना लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गट ‘क’ पदांच्या आगामी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या नव्या नियमाची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे.
कार्मिक विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार, गट ‘क’ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान ६ महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. संबंधित संगणक प्रमाणपत्र हे इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड, मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञान ज्ञान केंद्र अथवा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्था किंवा राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाशी संलग्न मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, किमान सहा महिन्यांच्या संगणक डिप्लोमा किंवा प्रमाणपत्राची ही अट दिनांक १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच, एखाद्या विशिष्ट पदाच्या भरती नियमांमध्ये यापेक्षा उच्च संगणक अर्हता निर्धारित करण्यात आली असल्यास, त्या पदासाठी संबंधित उच्च अर्हताच लागू राहील, असे कार्मिक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गट ‘क’ पदांच्या आगामी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी संगणक अर्हतेसंदर्भातील या नव्या नियमाची आतापासूनच नोंद घेणे आवश्यक आहे.