सहा महिन्यांत ६ ते ८ हजार नोकऱ्या देणार; मुख्यमंत्री यांची घोषणा – Goa Mega Bharti 2026
राज्यात रोजगारनिर्मितीला वेग देण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. ‘पुढील सहा महिन्यांत मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत ६ ते ८ हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत आणखी दोन हजार पदे भरली जातील,’ असे सावंत यांनी जाहीर केले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पणजीतील जुन्या सचिवालयात शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ‘गोमंतकीय युवकांना रोजगार देणे ही सरकारची प्रमुख प्राथमिकता असून रोजगारनिर्मितीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,’ असे सावंत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, ‘सध्या मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत ५ हजारांहून अधिक युवक-युवती नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत आतापर्यंत ३ हजारांहून अधिक युवकांची पारदर्शक पद्धतीने भरती करण्यात आली आहे. आगामी काळातही आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू राहील.’ ‘राज्यात खाण व्यवसायाला येत्या ऑक्टोबरपासून मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होईल,’ असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. खाणकाम पुन्हा सुरू झाल्यानंतर सरकारला सुमारे एक हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, ‘खाणी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दीर्घकाळ आर्थिक अडचणीत आलेल्या हजारो कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे. खाणकामाचा थेट परिणाम केवळ खाण कंपन्यांपुरता मर्यादित नसून ट्रकमालक, चालक, खाण कामगार, वाहतूकदार तसेच अन्य व्यावसायिकांनाही रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.’ मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सरकारी सेवेत दहा वर्षे पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.’ दरम्यान, पुढील सहा महिन्यांत रोजगाराच्या संधींचा मोठा टप्पा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतून स्पष्ट झाले.