४७ हजार होमगार्ड जवानांना नोकरीची प्रतीक्षा, नवीन महत्वाचा अपडेट – 47 Homeguard Bharti Update Latest Bharti
47 Homeguard Bharti Update Latest Bharti – होमगार्ड भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आला आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अटीतटीच्या क्षणी सहायक म्हणून काम करणाऱ्या राज्यातील सुमारे ४७हजार होमगार्ड जवानांना अद्यापही स्थायी नोकरीची प्रतीक्षा आहे. सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित असून, वाढीव मानधन मिळाले असले तरी पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून घेण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे. होमगार्ड हे अर्धसैनिक स्वयंसेवी बल असून, वर्षभर विविध बंदोबस्तांसाठी त्यांची नियुक्ती केली जाते. गणेशोत्सवासह अनेक महत्त्वाच्या प्रसंगी महाराष्ट्र होमगार्ड त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. सध्या एका जवानाला प्रतिदिनी १ हजार २८३ रुपये मानधन दिले जाते. यापूर्वी हे मानधन ६७० रुपये होते. वाढीव मानधनासाठीचा लढा यशस्वी झाला असला, तरी सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या होमगार्ड जवानांनी राज्यभर आंदोलनेही केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय जारी करून शारीरिक पात्रतेच्या काही कठोर अटी शिथिल केल्या. तसेच, वयोमर्यादा ५५ वरून ५८ वर्षे करण्यात आली. मात्र, अन्य महत्त्वाच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत.
वर्षभर कामाची हमी कमीच
नियमाप्रमाणे होमगार्ड जवानांना वर्षभरात १८० दिवस काम देण्यात येईल, असे ठरले आहे. मात्र, उर्वरित दिवसांत काम उपलब्ध न झाल्यास प्रपंच चालवावा तरी कसा, असा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात होमगार्ड जवानांना ३६५ दिवस कामावर ठेवण्याची मागणी केली आहे. ही मागणी अजूनही शासनदरबारी पूर्ण झालेली नाही.
१९४६ होमगार्ड अधिनियमातील बदलाची प्रतीक्षा कायम
केंद्रांच्या गृहमंत्रालयाकडे होमगार्ड जवानांच्या सोयीसुविधांबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात १९४६ होमगार्ड अधिनियमनात बदलाची प्रतीक्षा कायम आहे. मागणीनुसार होमगार्ड जवानांना नोकरीत कायम (स्थायी) करावे, जवानांच्या निवासासाठी वसतिगृहाची निर्मिती करावी, पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
दोन वर्षांपासून गणवेश भत्ता नाही
राज्यभरातील होमगार्ड जवानांना दोन वर्षांपासून गणवेश भत्ता मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. यात पूर्वी तीन वर्षांतून दोन गणवेश मिळायचे. नंतरच्या काळात यात बदल होऊन दीड वर्षात एका गणवेशासाठी अडीच हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, आता तर भत्ता मिळालेला नाही. एकट्या नागपूर शहर व ग्रामीण मिळून तीन हजार होमगार्ड जवान आहेत.